केंद्राकडून अद्यापही कोणतीच मदत न आल्याने अखेर राज्य सरकारने दुष्काळ निवारण्यासाठी स्वत:च्या तिजोरीतील २ हजार ९०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तसेच थकित वीजबिलामुळे बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी थकित बिलातील पाच टक्के रक्कम टंचाई निधीतून सरकार भरणार आहे, अशी माहिती महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात मंत्रालया आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आपत्ती निवारण कक्षाचे संचालक दौलत देसाई आदी उपस्थित होते. केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान मिळावी, यासाठी केंद्र शासनाकडे सुमारे ७ हजार ९०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. केंद्राची मदत जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या निधीतून मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आज २ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी विभागीय आयुक्तस्तरावर वितरित करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजनेचे पाईपलाईन दुरुस्तीचे तसेचे तात्पुरत्या नवीन पाईपलाईनच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक योजनांना यामधून मंजुरी दिली आहे. तसेच थकित वीजबिलामुळे बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी थकित बिलातील पाच टक्के रक्कम टंचाई निधीतून राज्य शासनाने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज बिला अभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहेत.
राज्य शासनाने दुष्काळ निवारणासाठी दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव आल्यानंतर मंडळस्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात येणार आहेत. एका छावणीमध्ये साधारणपणे 300 ते 500 जनावरांचा समावेश असणार आहे. जनावरांच्या संख्येसंदर्भात तसेच आवश्यकता भासल्यास एकाच मंडळात दुसरी छावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार आहे. राज्य शासनाने अनुदान दिलेल्या गोरक्षण संस्थांना चारा छावणी उघडण्याचे यापूर्वीच निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पाच ठिकाणी पूर्वीच चारा छावण्या सुरू झाल्या आहेत.